कर्मचाऱ्यांत रोष : दोन दिवसांत आटोपली बदली प्रक्रिया चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध विभागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया बुधवार व गुरूवार या दोन दिवसांत राबविण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील जवळपास २७५ ते ३०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती असून कर्मचारी संख्या अधिक असतानाही दोन दिवसांतच बदली प्रक्रिया गुंडाळण्यात आल्याने कर्मचाऱ्यांत रोष पसरला आहे. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग, वित्त विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. तर गुरूवारी दुसऱ्या दिवशी सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, सिंचाई विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना आपली नावे पाहता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मोठी स्क्रिन लावण्यात आली होती. त्यामुळे सभागृहात कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोन्ही दिवस रात्री उशीरापर्यंत बदली प्रक्रिया राबवून जवळपास २७५ ते ३०० कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्याची माहिती असून बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांचा निश्चीत आकडा मिळू शकला नाही. या बदली प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, राजेश राठोड यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या ३०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: May 13, 2016 01:02 IST