सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा : विजय वडेट्टीवार यांचा पुढाकारसावली : स्थानिक पंचायत समिती समोरील पटांगणात सांस्कृतिक परंपरा कायम ठेवत वडील थोरांच्या आशीर्वादाने जीवनाच्या क्षितिजाकडे एकमेकांना साथ देण्याचे वचन देत १४२ जोडपी विवाह बंधनात अडकली.शुक्रवारी सावली येथे पंचायत समिती समोरील पटांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या विवाह सोहळ्यात बौद्ध ५९ तर हिंदू धर्मीय ८३ जोडपी विवाहबद्ध झाली. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून आ. विजय वडेट्टीवार, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, रजनी हजारे, सावलीच्या नगराध्यक्षा रजनी भडके, जि.प. सदस्य दिनेश चिटनुरवार, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, तालुकाध्यक्ष राजेश सिद्धम, दिनेश चोखारे, पंचायत समिती सभापती चंदा लेनगुरे, उपसभापती मंगला चिमड्यालवार, राकेश गड्डमवार, कल्पना राखडे, घनश्याम येनुरकर, नंदा अल्लुरवार आदी उपस्थित होते.या विवाह सोहळ्याला १५ हजारच्या आसपास मंडळीनी आशीर्वाद देण्याकरिता उपस्थिती दर्शविली. सर्व जोडप्यांची रमाबाई आंबेडकर विद्यालयापासून ट्रॅक्टरवर वरात काढून वाजत गाजत बॅन्डच्या गजरात विवाहस्थळी आणले. त्यानंतर विवाह लावून सर्व जोडप्यांना पंखा, वाटर फिल्टर, मंगळसूत्र व संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तुंची भेट देण्यात आली. आजपर्यंतच्या कालावधीमध्ये सावली तालुक्यात सामूहिक विवाह झाला नव्हता. पहिल्यांदा अशा प्रकरचा सामूहिक विवाह सोहळा झाल्याने नागरिकांत आनंद दिसून आला. मेळाव्याला नागरिकांनी भरगच्च गर्दी होती. यशस्वीतेसाठी वडेट्टीवार बहुउद्देशिय मित्र मंडळ सावलीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
सावलीच्या मेळाव्यात १४२ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: April 23, 2016 00:54 IST