राजुरा : शिकवणी वर्गासाठी घरी बोलावून विनयभंग करणाऱ्या येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा. हरिशचंद्र नक्कलवार (५४) याला न्यायालयाने १३ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवणीसाठी घरी बोलावून विनयभंग केल्याची घटना बुधवारी घडली होती.पीडित मुलीच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी प्रा. हरिशचंद्र नक्कलवार यांच्या विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याच दिवशी अटक केली. त्यानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरा येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा. हरिशचंद्र नक्कलवार याने अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलीला व्याकरण शिकवितो म्हणून घरी बोलाविले. अर्धा तास व्याकरण शिकविल्यानंतर मुलीला फ्रेश होण्यास सांगितले. यावेळी मुलगी बाहेर जाण्यासाठी निघाली असता, हात पकडला. यावेळी मुलीने हाताला झटका मारून बाहेर पडली आणि गावाला जाण्यासाठी बसमध्ये बसली. तेव्हा प्राध्यापकाने बस स्थानक गाठले. बसमधुन उतरण्याचा मुलीला आग्रह केला. मात्र मुलगी बसमधुन उतरली नाही. तेव्हा फोन करून जे काही झाले ते विसरून जा, असे म्हणाल्याचे मुलीच्या तक्रारीत नमूद आहे. मुलीने याची तक्रार प्राचार्यांकडेही केली. त्यानंतर विद्यार्थीही पोलीस ठाण्यावर धडकले. लेखी तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी प्रा. हरिशचंद्र नक्कलवार याच्याविरूद्ध ३५४ अ (१), ३५४ ड (१) भादंवी, पास्को बाल लैगींक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाचा तपास राजुराचे ठाणेदार विलास निकम यांच्या मार्गदर्शनात देवेंद्र ठाकुर करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
‘त्या’ प्राध्यापकाला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: April 18, 2015 01:06 IST