परिवहन महामंडळाचा उपक्रम : आठवडाभरात चंद्रपूर आगारात दीड लाख जमापरिमल डोहणे चंद्रपूरसध्या परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट दरासोबत एक रुपया अतिरिक्त घेतला जात आहे. या एका रुपयात प्रवासादरम्यान अपघात झालाच तर मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रुपयांचा अपघाती सहायता निधी देण्यात येणार आहे. परिवहन महामंडळाने हा उपक्रम १ एप्रिलपासून सुरू केला आहे. यामुळे प्रवाशांना तर दिलासा मिळालाच आहे; सोबत महामंडळाचेही उत्पन्न वाढणार आहे. १ एप्रिलपासून राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करताना झालेल्या अपघातात मृत किंवा जखमी प्रवाशांसाठी आर्थिक निधी वाढविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार महामंडळाच्या बसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना’ संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आली आहे. अपघात सहायता निधी योजनेपोटी प्रत्येक प्रवाशाकडून तिकीटाच्या किमतीसोबतच एक रुपया अधिकचा घेतला जात आहे. या एक रुपयाचेही रितसर तिकीट प्रवाशांना दिले जात आहे. प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या या एक-एक रुपयांच्या बळावर एकट्या चंद्रपूर आगाराच्या तिजोरीत आठवडाभरात एक लाख ५८ हजार ३७१ रुपये जमा झाले आहे. या योजनेमुळे आर्थिक तोट्यात चाललेले एसटी महामंडळ सावरू शकणार आहे. यापूर्वी महामंडळातर्फे प्रवाशांना आर्थिक मदत देण्यात येत होती. प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक लाख रुपये, अपघातात कायम स्वरूपाचे अंशत: अपंगत्व आले तर ७५ हजार रुपये, सुधारणारी दुखापत असेल तर अशा जखमींना ५० हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात येत होती. एसटी महामंडळ ही मदत देत असले तरी ती आपादग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी तोकडीच होती. परंतु आता हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना सुरू करून यात मदत निधी सरसकट १० लाख रुपये करण्यात आला आहे. मासिक पासमध्येही तरतूदया योजनेमध्ये प्रत्येक प्रवाशांकडून तिकिटासोबत या योजनेचे पैसे घेतले जाते. जर प्रवासी हा मासिक पासधारक असेल तर पास काढताना किंवा नूतनीकरण करताना त्याला ठराविक रकमेपेक्षा पाच रुपये अधिक द्यावे लागतील. जर प्रवासी हा त्रैमासिक पासधारक प्रवासी असेल तर पास काढताना किंवा पास नूतनीकरण करताना त्याला ठराविक रकमेपेक्षा पंधरा रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहे. संपूर्ण बसच एखाद्या कार्यक्रमासाठी भाड्याने घेतली तर अशावेळी करार करतानाच नियोजित रकमेच्या ५० रुपये अधिक द्यावे लागणार आहे. या भाड्याने केलेल्या बसला अपघात झाला व कुणाचा मृत्यू झाला तर त्याला योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे.अनेक वाहक योजनेपासून अनभिज्ञएक रुपया अतिरिक्त कशाचा, याबाबत अनेक वाहकाला प्रवाशांनी विचारले असता १ एप्रिलपासून तिकीट दर वाढले, असे वाहकांकडून सांगितले जात आहे. यावरून या योजनेबाबत वाहक अनभिज्ञ असून अनेक प्रवासीही अनभिज्ञ आहेत.
एका रुपयात १० लाखांचे सहाय्य
By admin | Updated: April 10, 2016 00:43 IST