-चिन्मय लेले
वाटतं आपल्यालाही, कुणीतरी आपलाही पर्सनल स्टायलिस्ट असावा.
हे नको, ते घाल सांगणारा. आपल्यासाठी खास कपडे शिवून देणारा. पण मिळतो का कुणी चटकन असा? मिळालाच तर त्याच्या अशा पर्सनलाईज्ड सेवेचे पैसे देणं परवडेल का आपल्याला? नाहीच परवडत कारण, एकतर कुणाही टेलरकडे टाकलेले कपडे चटकन शिवून मिळणं मुश्किल, त्यात स्पेशलाईज्ड तर विचारायलाच नको. पैसे देवूनही उत्तम कारागीर मिळणं मुश्किल.!
***
कितीदा फोन करा त्या इलेक्ट्रिशियनला
येतो, येतो म्हणतो पण कधीच लवकर येत नाही.
बोललं काही तर म्हणतो, असल्या किरकोळ कामासाठी वेळ नाही आपल्याला, जमत असेल तर थांबा नाहीतर दुसर्या कुणाला बोलवा.
न थांबून सांगतो कुणाला.थांबतो, म्हणतील तेवढे पैसे देतो
पण ये बाबा लवकर..
-अशी आईची कुरकुर बडबड ऐकलीय ना नेहमी.
इलेक्ट्रिशियन मिळणं एवढं मुश्किल झालंय आजकाल.का?
**
प्लंबर?
एका फोनवर येतो कधी आपल्या घरी?
मरमर करत गेलो तरी पटकन एखादा मिस्त्री-गवंडी भेटतो कधी आपल्या कामाला?
रंग द्यायचा काढला घराला?
तर काय बजेट सांगतात पेंटर, आहे काही अंदाज?
गॅरेजमधे गेली गाडी, अमूक स्पेअर पार्ट उडालाय, चार दिवस लागतील असं सांगितलं मॅकॅनिकने तर त्याच्याशी पैशाबाबत घासाघीस करायची आहे आपली ताकद?
***
हे प्रश्न कधीतरी विचारले स्वत:ला तर ते प्रश्नच तुम्हाला उत्तरांच्या शोधात घेऊन जातील आणि भेटवतील नव्या भारतीय अर्थव्यवस्थेला आणि त्यात वेगानं उपलब्ध होणार्या रोजगारसंधींना!
‘इस देश में जॉब ढुूंढनाही एक जॉब है’ असं म्हणून नकारघंटाच वाजवत आणि ऐकत बसलं तर काहीच दिसणार नाही, ऐकूही येणार नाही. फार्फार तर रडून-भेकून व्यवस्थेला, नशिबाला, घरच्यांना दोष देता येईल की, काय आपण शिक्षण कमी, पैसा कमी, संधी नाही म्हणून आपल्याला बरं काम मिळत नाही.
आजचं वास्तव मात्र तसं नाही. नव्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेनं ज्या क्षेत्रांच्या शिडात हवा भरली आहे, त्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. मात्र त्यांना कुशल मनुष्यबळच मिळत नाही. हे उद्योग म्हणतात की, आमच्यात सामावले जातील, उत्तम काम करू शकतील असं स्किल ज्या हातांमधे आहे ती माणसंच मिळत नाहीत. म्हणून त्यांच्याकडे जागा रीकाम्या आणि बाहेर समाजात मात्र हाताला काम नाही म्हणून अनेकजण रिकामटेकडे?
-हे असं का होतंय?
तर स्कीलबेस कामांना आपल्या समाजात महत्वच नाही.
सुतारकाम, रंगकाम, गवंडी, प्लंबिग, विणकाम, गॅरेज मॅकेनिक, ड्रायव्हर्स, वेल्डर, इलेक्ट्रिशियन ही सगळी कामं, त्यांना आपल्या समाजात प्रतिष्ठा नाही, ग्लॅमर नाही. म्हणून ती कामं करायला तरुण मुलं तयार नाहीत. खरंतर अनेक मुलांना ( अर्थात मुलींनाही) हे माहिती असतं की आपण काही आयआयटीत जाऊन शिकू शकू या कुवतीचे नाही. आपली पुस्तकी शिक्षणातली प्रगती यथातथाच आहे. त्यात मनही रमत नाही. त्यापेक्षा आपल्या हाताला काही स्किल मिळालं तर आपण आपलं काम मिळवू शकू, रोजगार शोधू शकू. पण हे मान्य करून त्या दिशेनं जाणं त्यांना जमत नाही त्याची कारणं दोन. एक म्हणजे या कामांना प्रतिष्ठा नाही असं त्यांना वाटतं, दुसरं ही सगळी काम दुसर्या कुणीतरी करावी, मला एसीतली नोकरी हवी असा नव्यानं निर्माण झालेला एक आडमुठा अट्टाहास आणि खोटा अहंभाव.
हा खोटा अहं बाजूला ठेवला आणि पोकळ प्रतिष्ठेच्या कल्पना बाजूला सारून स्वच्छ नजरेनं पाहिलं तर आजच्या अर्थव्यवस्थेची एक नवीनच गरज निर्माण येईल. या अथव्यवस्थेला कुशल कामगार हवे आहेत. ज्यांच्या हातात हुनर आहे, जे प्रोफेशनली कामं करू शकतात असे कुशल कारागीर हवे आहेत. मुख्य म्हणजे पुर्वीसारखं कमी पैशात त्यांनी काम करावं हे या नव्या पद्धतीत अभिप्रेतच नाही. उलट हातातल्या कौशल्याची कदर करत या कामगारांना उत्तम पैसा मिळण्याची, नव्हे तर आपल्या कामाचं दाम वाजवून घेण्याचं स्वातंत्र्य मिळतं आहे. ते वाढणार आहे.
मुद्दा एवढाच की, आपण मधल्या फळीत आहोत, हे मान्य करण्याची आणि आपल्या हाताला एखाद्या उत्तम कौशल्याची जोड देण्याची तयारी आहे का? मुळात ज्याला त्याला आपल्या कुवतीचा अंदाज असतोच. नसेल तर तो योग्यवेळी यायला हवा.
आपल्या कौशल्याच्या जोरावर आपण या नव्यानं विस्तारत जाणार्या क्षेत्रात मुसंडी मारू शकतो, उत्तम करिअर घडवू शकतो हा आत्मविश्वास आपण स्वतर्ला देऊ शकणार आहोत का?
कमीत कमी प्रशिक्षण खर्चात एका नव्या व्यावसायिक संधीचं सोनं करू शकू का?
या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. येत्या काळात कंपन्याना या स्कील्डबेस कामांची गरज पडणार आहे, त्या कामांना यापुढे कुणी कमी लेखू नये.