खामगाव : तहसीलमधील पुरवठा विभागाच्या कार्यालयात तुमचे काम असेल तर तुम्हाला हवी असलेली कागदपत्र, तुम्ही दिलेला अर्ज शोधण्यासाठी कर्मचार्याची गरज नाही. तुम्ही बिनदिक्कतपणे कार्यालयातील कपाटात हात घालुन कागदपत्रे शोधु शकता हे वास्तव लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये उघड झाले. पुरवठा विभगाच्या भोंगळ कारभारामुळे कोणीही या व कागदपत्रे स्वत: हाताळा, असे प्रकार सर्रास सुरु आहेत. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला राशन कार्ड महत्वाचे आहे. यासाठी या विभागात दररोज नागरिकांची गर्दी असते. मात्र या विभागात काम महिनोगणती सुध्दा होत नाही. दररोज नागरिक रेशनकार्डसाठी चकरा मारतात. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना त्याचे काहीही घेणेदेणे नसते. अखेर कंटाळून नागरिकांना दलालांशी जवळीक साधावी लागते. यानंतर मात्र त्यांचे काम त्वरित करण्यात येते. या विभागात दलालांची चलती आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या उपस्थितीत तसेच अनुपस्थितीत सुध्दा या विभागातील कागदपत्रे स्वत: हाताळतात. यामुळे एखाद्याची कागदपत्रे गहाळ झाली तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऐनकेनप्रकार काम करण्यास टाळाटाळ करणे येथील कर्मचार्यांचे नेहमीचेच आहे. तर अनेकांचे पैसे घेवूनही काम होत नसल्याने नागरिकांचा आवाज सुध्दा वाढतो. त्यामुळे या विभागातील कर्मचार्याला खुर्ची सोडून निघावे लागते. त्यांच्या मागोमाग नागरिकही निघतात. त्यामुळे कर्मचार्यांच्या मागे नागरिकांचा जथ्था असे चित्र येथे नेहमीच पाहायला मिळते. या विभागावर तहसीलदारांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.
आपणच शोधा आपला कागद
By admin | Updated: June 28, 2014 22:39 IST