कोरोना सारख्या संकट काळामध्ये आपल्या जीवाची कुटुंबाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता विद्युत पुरवठा सुरळीत राहावा म्हणून वीज अभियंता, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी सतत काम करत आहेत. मात्र शासनाकडून या कर्मचाऱ्यांचा कसलाही विचार करत नसल्यामुळे दुसरबीड १३२ के. व्ही. उपकेंद्र येथे शासन व प्रशासनाचा काळ्या फिती लावून जाहीर निषेध करण्यात आला. वीज कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या काम बंद आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. महावितरणच्या या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा, कोरोना काळामध्ये इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात वीज उद्योगातील तिन्ही कंपनीतील कायम, कंत्राटी कर्मचारी २४ तास काम करीत आहेत. तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिला नाही. शासनाच्या कोणत्याही सुविधा दिल्या नाही. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळाव्या आणि विद्युत कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून डावलले जाऊ नये, याकरिता हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कंत्राटी यंत्र चालक रहेमान कुरेशी यांनी केले आहे. १३२ केव्ही उपकेंद्र मधील इतर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. उपकेंद्र दुसरबीड येथील आप्पासाहेब मोगल, विवेक मुळे, शुभम चव्हाण, धनराज दुरबुडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST