आसलगाव (जि. बुलडाणा) : येथील आठवडी बाजारात जाणार्या प्रमुख रस्त्यावर असलेल्या पुत्रउल्हासी नदीवरील पुलाच्या कामाला तांत्रिक मंजुरात मिळाली आहे; मात्र अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने या पुलाचे काम सुरू झालेले नाही. परिणामी, पावसाळ्यात गावात येणार्या नागरिक व बाजारासाठी येणार्यांना नदीपात्रातून मार्ग काढावा लागत आहे. परिणामी, या पुलाचे काम त्वरेने मार्गी लावण्यात यावे, अशी या आदिवासीबहुल भागातील नागरिकांची मागणी आहे. आसलगावचा मंगळवारी बाजार भरतो. तालुक्यातील ग्रामीण भागातील हा सर्वात मोठा बाजार आहे आणि तो नेमका पुत्रउल्हासी नदीच्या काठावर भरतो. त्याकरिता नदीपात्रातील पाण्यातून मार्ग काढून बाजारात जावे लागते. या नदीपात्रात राजुरा धरणाच्या सांडव्यातील पाणी सोडल्याने ४ महिने या नदीला पाणी असते. त्यामधून गावातील वयोवृद्ध विद्यार्थी, महिला यांची त्यातून मार्ग काढताना तारांबळ उडते. याकरिता जिल्हा परिषद सदस्य ज्योती ढोकणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर या नदीवरील पुलासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तांत्रिक मंजुरात देण्यात आली आहे; मात्र अद्याप निधीची उपलब्धता झालेली नाही. त्यामुळे हे काम थंडबस्त्यात आहे. पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्योती ढोकणे यांनी पालकमंत्र्यांना हे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, याबाबतही निवेदन दिले आहे. नदीला पूर आल्यास नागरिकांना एक किलोमीटरचा फेरा मारून कामासाठी गावातून बाहेर जावे लागते. सोबतच पावसाळ्यात नदीला पाणी राहत असल्याने दुचाकी, चार चाकी वाहने गावात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
निधीअभावी आसलगाव येथील पुलाचे काम रखडले!
By admin | Updated: October 15, 2015 00:49 IST