सिंदखेडराजा तालुक्यात सतत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी व्हावा, म्हणून शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र कोरोना वाढत असताना जनतेकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध पाळल्या जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन न करता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून काही दुकाने बंद करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनकडून स्थानिक यंत्रणेला रात्रीची संचारबंदी व जमावबंदी आदेशाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. कडक निर्बंधाच्या पहिल्या दिवशी ६ एप्रिल रोजी दुसरबीड येथे मंगळवार बाजार असल्यामुळे अनेक बाहेरगावचे दुकानदार आपला माल घेऊन आले होते. सर्व ठिकाणी शासनाच्या निकषानुसार दिलेली दुकाने बंद करण्याकरिता किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ पवार हे आले होते. पोलिसांसह ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस पाटील यांना घेऊन महामार्गावरील दुकाने बंद करण्याची सूचना देण्यात आल्या. पोलीस निघून गेल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस पाटील यांना कोण जुमानणार त्यानुसार काही प्रामाणिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली, तर काहींनी दुकानाचे शटर अर्धवट बंद करून आपला व्यवहार चालूच ठेवला. शासनाने दिलेल्या या आदेशाला तसेच काेविड-१९ ची शृंखला तोडण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले निर्बंध पाळण्यामध्ये व त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अनेक लोकांचा विरोध दिसून आला. त्यामध्ये शासकीय महसूल, आरोग्य विभाग यांचा सुद्धा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे दिसून आले आहे. अनेक लोकांना शासनाने काय बंद काय चालू ठेवण्याचे आदेश दिले आहे हे सुद्धा कळू शकले नाही. मात्र आता ३० एप्रिलपर्यंत दारूचे दुकान बंद राहणार असल्याने दारू विक्रेत्यांनी अवैध दारू विक्री सुरू केली होती.
दुसरबीड येथे कुठे बंद, तर कुठे दुकाने सुरू- A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST