बुलडाणा : जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्यानंतरही पाणीपुरवठय़ाची व्यवस्था नसणे किंवा गावांमध्ये कोणत्याही प्रकारही योजना नसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्याच लागत आहेत. प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे काही गावातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, पिंपळखेड येथे पाणीटंचाई दूर झाली नसून, प्रशासनाने टँकर बंद केल्यामुळे पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून, टँकर सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. यासोबतच चिखली तालुक्यातील सातगाव मार्गावर असलेल्या छोट्या-छोट्या गावांमधील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच परराज्यातून जिल्ह्यात अनेक नागरिक येतात. मोकळ्या जागेत राहुट्या टाकून महिनोंमहिने वास्तव्य करतात. त्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणीपुरवठय़ाच्या फुटक्या व्हॉल्व्हमधून पाणी भरण्यात येते. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. बुलडाणा तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला संततधार पाऊस झाला. बुलडाणा तालुक्यात दरवर्षी सरासरी ७७0.१ मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी आतापर्यंत ३0७ मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र तालुक्यातील पिंपळखेड येथे अद्यापही पाणीटंचाई आहे. पिंपळखेड येथे उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. दरवर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंंत या गावासाठी पाण्याचे टँकर सुरू असतात. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने कोणतीही सूचना न देता मागील सहा दिवसांपासून टँकर बंद केले आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
संततधार पावसानंतरही पाणीटंचाई!
By admin | Updated: July 21, 2016 00:58 IST