मोताळा (बुलडाणा): यंदाच्या पावसाच्या हुलकावणीमुळे सरासरीपेक्षा मोताळा तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे. परिणामी, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट निर्माण आहे. याचा सरळ परिणाम रब्बी हंगामावर होत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीकडून गुरूवार, १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्हा परिषद सर्कलनिहाय संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याकरिता आढावा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा परिषद सर्कलनिहाय केले गेले असून, गुरूवारी सकाळी होणार्या या पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीसाठी ११ ते १२ धामणगाव बढे-जिल्हा जि.प. सर्कल, १२ ते 0१ रोहिणखेड-कोर्हाळा बाजार जिल्हा परिषद सर्कल, दुपारी 0१ ते 0२ शेलगाव बाजार-तळणी जिल्हा परिषद सर्कल, 0२ ते 0३ कोथळी-बोराखेडी जि.प. सर्कल, 0३ ते 0४ मोताळा-तालखेड जिल्हा परिषद सर्कलची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. आढावा बैठकीस संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पाणी पुरवठा कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समिती सभापती संजय किनगे (पाटील) यांनी केले आहे.
पाणीटंचाई कृती आराखडा बैठक
By admin | Updated: November 13, 2014 00:24 IST