अमडापूर : चिखली तालुक्यातील माेठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या अमडापूरचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. १७ पैकी केवळ डाॅ. संजय गवई व त्यांची पत्नी वैशाली गवई हे विजयी झाले आहेत. त्यामुळे, सरपंचपदी या दाम्पत्यापैकी एकाची वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे.
चिखली तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या अमडापूर येथे परिवर्तन विकास आघाडी पॅनलने १७ पैकी १३ जागा जिंकून ग्रामविकास पॅनलचा पराभव केला आहे. आता सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने सर्व जनतेचे लक्ष लागून आहे. प्रस्थापितांना जबर धक्का बसला आहे. अमडापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या कुटुंबातील डॉ. संजय गवई हे वाॅर्ड क्र.२ मधून सर्वाधिक मतांनी निवडून आले आहे. तसेच त्यांच्या पत्नी वैशाली संजय गवई या वाॅर्ड क्र ३ मधून निवडून आल्या आहेत. वाॅर्ड क्र. २ व ३ हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने तसेच १७ पैकी अन्य कोणीही ह्या प्रवर्गातून निवडून न आल्यामुळे गवई दांपत्यापैकीच सरपंच हाेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे रोस्टर निघाले आहे.