सोनोशी : गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत आहे, त्यामुळे अनलाॅक प्रक्रिया सुरू आहे. बसफेऱ्या पूर्ववत हाेत आहे. लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू झाल्या तरी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
गत वर्षापासून काेराेना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळीत झाले हाेते. बसफेऱ्याही बंद करण्यात आल्या हाेत्या. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात लसीकरणसुद्धा होत आहे. त्यामुळे प्रवास करण्यात आता कोणतीही अडचण नसल्याने किमान लसीकरण झालेल्या प्रवाशांना तरी प्रवास करण्याची मुभा ग्रामीण भागातही देऊन बससेवा सुरू करावी, अशी मागणी हाेत आहे. सिंदखेड राजा तालुका असल्याने व सोनोशी परिसरातून पंचवीस ते तीस ग्रामीण भाग व त्यातील गावे ही सरळ सिंदखेड राजासाठी जोडले गेलेले आहे; पण सिंदखेड राजाला जाण्यासाठी केवळ बसचाच पर्याय आहे. त्यामुळे या गावातील लाेकांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे सिंदखेड राजावरून बोरखेडी ते धानोरापर्यंत जाणाऱ्या बसेस तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी हाेत आहे.