मोताळा : मोताळा-नांदुरा आणि मोताळा-मलकापूर रस्त्यांवर लघू व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतूककोंडी होत आहे, तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
मोताळा येथे खरेदीसाठी येणारे नागरिक वाटेल तेथे वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पोलिसांनी बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून करण्यात येत आहे.
मुख्य रस्त्यांवर लघू व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. काहींनी तर चक्क रस्त्यावरच दुकाने थाटल्याचे चित्र मोताळा येथे दिसून येत आहे. तर खरेदीसाठी येणारे नागरिक या दुकानांवरून खरेदी करताना आपली वाहने चक्क रस्त्यावर उभी करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे बेशिस्त वाहतुकीलाही उधाण आले आहे. मिळेल त्या जागेवर वाहने उभी करणे, वाटेल तशी वाहने चालविली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघातही घडत आहेत. संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. नगरपंचायतीच्या वतीनेही अनेक दिवसांपासून रस्त्यावरील अतिक्रमण हटविलेले नाही, तरी मोताळा येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
----
चौकट...
वाहतूककोंडी झाली नित्याचीच बाब
अपुऱ्या जागेमुळे अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. काहींकडून अर्ध्या रस्त्याचा बिनदिक्कत वापर केला जातो, तर विविध ठिकाणी वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
---