नागेश घोपे/वाशिमविधानसभा निवडणुकीवर वर्हाडातील सट्टेबाजार सध्या गरम झाला आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या युतीचा घटस्फोट.. कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत झालेली बिघाडी.. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप- बहुजन महासंघ आणि काही बंडखोरांमुळे वाढलेली चुरस ह्यकॅशह्ण करण्यासाठी सटोडीये कामाला लागले असून, लक्षवेधी लढत असलेल्या मतदारसंघांवर मोठी उलाढाल सुरू आहे. निवडणुकीतील चुरस वाढल्यामुळे याचा परिणाम सट्टाबाजारातही दिसून येत आहे. सद्यस्थितीत अमरावतीच्या लढतीवर सर्वाधिक उलाढाल सुरू आहे. येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांना मात देण्यासाठी भाजपने माजी राज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख यांना ऐनवेळेवर पक्षात आयात करून रिंगणात उतरिवले आहे. गत निवडणुकीत देशमुखांच्या बंडाळीने शेखावत यांना घाम फोडला होता. यवतमाळ मतदारसंघावरही सट्टाबाजारात मोठी उलाढाल सुरू आहे. राज्यात काँग्रेसचा किल्ला लढविण्याची जबाबदारी असलेले प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहूल ठाकरे येथून नशिब आजमावित आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात मदन येरावार यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसने संदीप बाजोरीयांना मैदानात उतरविले आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील लढतही लक्षवेधी ठरणारी आहे. येथे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्याशी एकेकाळचे त्यांचे शिष्य विजय देशमुख रिंगणात आहेत. गुरू शिष्याच्या या लढाईत भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी रंगत आणली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघावरही सटोडियांचे लक्ष आहे. येथे भाजपने माजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर कमळ फुलविण्याची धुरा सोपविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार प्रकाश डहाके यांना डावलून ऐनवेळेवर माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे डहाके यांनी मनगटावरील घड्याळ उतरवित बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. शिवसेनेने जिल्हाप्रमुख सुधिर कव्हर यांना मैदानात उतरवून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे येथील लढतीवरही सटोडीयांचे लक्ष लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातही चांगली उलाढाल सुरू आहे. काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदा यांच्या विरोधात भाजपने विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आकाश यांना रिंगणात उतरविले आहे. वर्हाडातील ही निवडणूक नव्या राजकीय समिकरणांना दिशा देणारी आहे. त्यामुळे महत्वाच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत सट्टाबाजारांचा अंदाज फोल ठरला होता. यावेळी नेमके काय होते, हे बघण्यासारखे राहणार आहे. मतदानाला अजून सात दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत या सट्टेबाजारातील दर कमी जास्त होणार आहेत. पोलिस यंत्रणेचा अंदाज, काही राजकीय विश्लेषकांची मतं अजमावत कुणावर पैसे लावावेत याचा अंदाज बांधला जात आहे. जसेजसे वातावरण बदलत जाईल, तसतसा बाजारातील तेजीला जोर येणार आहे. प्रत्यक्षात या बाजारात सट्टेबाज मालामाल होणार, की पैसे लावणारा, हे निकालाच्या दिवशीच समजणार आहे. *मुख्यमंत्रीपदावरही सट्टाराज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून सध्या सट्टाबाजार गरम आहे. युती आणि आघाडी केवळ मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेतून तुटली आहे. मुख्यमंत्री पदासाठी सध्या भाजपचे देवेंद्र फडणविस, पंकजा मुंडे, शिवसनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चुरस आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे व भाजपचे विनोद तावडे आणि एकनाथ खडसे हेदेखील या स्पर्धेत असले तरी, सट्टाबाजारात पवार, फडणविस, ठाकरे यांच्यावरच खरी उलाढाल सुरू आहे.
व-हाडातील सट्टाबाजार गरम!
By admin | Updated: October 9, 2014 00:21 IST