बँका,कंपन्यांची होते नाहक बदनामी
खामगाव : आॅनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची माहिती काढून व त्यांना कॉल करुन, आमिष दाखवून लुबाडण्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. या कामात सुशिक्षीत बेरोजगारांचा पध्दतशीर वापर करण्यात येत असल्याचे दिसून येते. या प्रकारात बँका व आॅनलाईन शॉपिंगची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना मात्र नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे.आपल्या देशात तांत्रिक स्वरुपाचे उच्च शिक्षण घेतलेल्या पण बेरोजगार असलेल्या युवकांची कमतरता नाही. बेरोजगारीमुळे निराश झालेले हे युवक पैशांसाठी प्रसंगी कोणतेही काम करायला तयार होतात. याचाच फायदा घेत सायबर गुन्हे करणाऱ्यांची टोळी त्यांचा फसवणुकीच्या या कामासाठी वापर करुन घेत असते.सायबर चोऱ्या करणाऱ्यांमध्ये मुख्यत्वेकरुन झारखंड राज्यातील जामतारा येथील टोळी सक्रि य असून यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंतच्या सायबर चोऱ्यांच्या घटनांमध्ये अनेकदा जामतारा येथील टोळक्याचा समावेश असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यासाठी त्यांना संबंधित परिसरात प्रशिक्षण सुध्दा दिले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे सर्व नियोजनबध्द पध्दतीनेच केले जात असून याकरिता सुशिक्षीत बेरोजगारांचा कल्पकतेने वापर करण्यात येत असल्याचे दिसून येते. उत्तम इंग्रजी व शुध्द हिंदी बोलणाऱ्या या भामट्यांकडून बोलण्या-बोलण्यात केव्हा फसविले जाते ते कळतही नाही. अनेक नागरिकांना असे फोन येत असल्याच्या तक्रारी येत असून पोलिस प्रशासनाच्या सायबर सेलकडून सुध्दा नागरिकांना फोन कॉल्सला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत असते. तसेच बँकांना सुध्दा नाहक बदनामीला सामोरे जावे लागत असल्याने बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचना देणे सुरु केलेले आहे. यात बँकेच्या कुठल्याही प्रतिनिधीकडून अकाऊंट नंबर किंवा पीन नंबर मागण्यात येत नाही अशा सूचना बँकांमध्ये दर्शनी भागात लावण्यात येत आहेत. सुशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत अशा घटना घडतातच.