कोथळी : बुलडाणा तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्याने मैदान आखणीसाठी पांढर्या चुन्या ऐवजी चक्क ब्लीचींग पावडरचा गैरवापर केल्याचा प्रकार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त आयोजीत ध्व्जारोहणाप्रसंगी ग्रामपंचायत समोर उघडकीस आला.कोथळी गावात गेल्या कित्येक वर्षापासून स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी आपापल्या शाळेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलांची एकत्रीत प्रभात फेरी निघते. प्रभात फेरी दरम्यान क्रमश: ईब्राहिमपूर ग्रामपंचायत, कोथळी ग्रामपंचायत व मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न होत असतो. कार्यक्रमासाठी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ एकत्र येत असल्याने संबधीत ठिकाणी साफसफाई व सजावटीसह घ्वजारोहण व राष्ट्रगीतासाठी रांगेत मुलांना उभे राहण्यासाठी चुन्याचा वापर करीत मैदान आखल्या जाते. मात्र यावर्षी कोथळी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्याने ग्रा.पं. समोर चुन्या ऐवजी ब्लीचींग पावडरचा गैरवापर करीत मैदानाच्या रेघा ओढल्या. ही बाब ध्वाजारोहणाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या लक्षात आली. या बाबत ग्रामसभेदरम्यान माजी सरपंच पांडुरंग चित्ते यांनी ग्रामविकास अधिकर्याला धारेवर धरले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सदर बाब आरोग्य सेवक पी. एन. वैराळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. विशेष बाब म्हणजे दोन दिवस आगोदरच कोथळी ग्रा. पं. ला ब्लीचींग पावडरचा वापर करण्याबाबत पत्र दिले गेले असून, राहूल वाघोदे या युवकाने जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन यांचेकडे ब्लीचींग पावडर बाबत पाठपुरावाही केला होता. मात्र कोथळी ग्रामपंचायत ब्लीचींग पावडरचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी न करता चुना म्हणून करीत आहे. तर दुसरीकडे सहा ते सात दिवसानंतर नागरिकांना पिण्याचे पाणी ब्लीचींग पावडर विना पुरवीले जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबधीत अधिकार्यावर कारवाई करावी व ब्लीचींग पावडर युक्त पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मैदान आखणीसाठी ब्लीचींग पावडरचा वापर
By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST