बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केेलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात गावे, गरीब शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक, उद्योजक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली.
ते बुलडाणा येथे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अॅड. आकाश फुंडकर, प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार विजयराज शिंदे, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, सरचिटणीस प्रभाकर वारे, आशिष व्यवहारे, हर्षल जोशी, रघुनाथ खेर्डे उपस्थित होते. मोदी सरकारच्या २०२१-२२च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणपासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनविण्याचा एक सुदृढ पायादेखील समाविष्ट करण्यात आला असल्याचे पेशकार यांनी सांगितले. हा सर्वांचा अर्थसंकल्प आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. भारतालाही त्याचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आर्थिक स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी नवे कर लावणे स्वाभाविक होतेे. मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पातील आरोग्यविषयक तरतुदीत गेल्यावर्षीच्या तुलनेत १३७ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, ही तरतूद ९४ हजार कोटी रूपयांवरून २.३८ लाख कोटी रूपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. ‘कोविड १९’साठी तयार करण्यात आलेल्या लसीसाठी वर्ष २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ३५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये पोषणविषयक उत्तम परिणाम देणारी धोरणे राबविण्याची योजना आखली जाणार असल्याचे पेशकार यांनी सांगितले.