सिंदखेडराजा (बुलडाणा): अज्ञात वाहनाने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जागेवरच ठार झाल्याची घटना पळसखेड गावानजीक २८ नोव्हेंबर रोजी रात्री दरम्यान घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, लोणार तालुक्यातील हत्ता येथील निलेश देवीदास चेके (२५) व तांबोळा येथील गजानन अर्जुन राठोड (२६) हे दोघे एम.एच. २८. ८२३७ क्रमांकाच्या मोटारसायकलने जालना येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून जालना येथून हत्ता आपल्या गावाकडे परत जात असताना पळसखेड चक्का गावानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जब्बर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील निलेश चेके व गजानन राठोड हे दोघेही जागेवरच ठार झाले. ते लोणार शहरामध्ये मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय करीत असून, दोघेही अविवाहित होते. घटनेची माहिती मिळताच सिंदखेडराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार मसराम, पो.ना. काकड व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतकांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सिंदखेडराजा पोलिस करीत आहेत. पळसखेड गावाजवळील वळणावर गेल्या एका वर्षात १0 व्यक्तींचा बळी गेला आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दोन युवक जागीच ठार
By admin | Updated: November 29, 2014 22:57 IST