वाशिम जिल्ह्यातील देवठाणा येथील ११ युवक भाविक देवदर्शनासाठी जीपने (क्रमांक एम-एच-२२-यू- ६५२१) ने गेले होते. रविवारी शेगाव येथे दर्शन आटोपून ते चिखलीमार्गे शिर्डीकडे जात होते. दरम्यान, देऊळगावराजा कुंभारी परिसरातील बायपास मार्गावर रस्त्याच्या बाजूने एक ट्रक उभा होता. जीपचालकाला त्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याचे वाहन त्या ट्रकवर धडकले. या अपघातात चालक प्रवीण अभिमान हेंबडे व आतील प्रवासी ज्ञानेश्वर काशिनाथ खडसे हे ठार झाले. वाहनातील युवक वैभव खडसे, आकाश राऊत, सुनील हिवाळे, भागवत वानखेडे, गणेश इंगोले, गणेश गवांदे, राम पाटील, आकाश खडसे हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती पोलीस स्टेशनला कळताच पीएसआय बसवराज तमशेट्टे हे आपल्या सहकाऱ्यांसह अपघात स्थळी पोहोचले. तेथून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ जालना व काहींना औरंगाबाद दाखल करण्यात आले, घटनेची तक्रार रवी अभिमान हिंबाडे यांनी पोलिसांना दिल्यानंतर देऊळगावराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पीएसआय बसवराज तमशेट्टे व त्यांचे सहकारी करीत आहेत.
भाविकांच्या वाहनाला अपघात, दोन ठार, नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST