शेगाव (बुलडाणा) : लोहारा येथून शेगावकडे येणारे मोटारसायकलस्वार झाडावर आदळल्याने या अपघातात दोन जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज ३0 नोव्हेंबर रोजी रविवारी दुपारी घडली. पातुर्डा ता. संग्रामपूर येथील राजू बुढन शाह (२३), शे. बन्नू शे. इस्माईल कुरैशी आणि गोलू दादाराव वानखडे हे तिघे लोहारा ता. बाळापूर येथे एका मौलानाकडे उपचार करून घेण्यासाठी गेले होते. उपचार घेतल्यानंतर ते एम.एच. २८ ए.ए.९६३५ या मोटारसायकलने परत येत होते. दरम्यान, त्यांची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकल्याने या अपघातात राजू शाह हा युवक जागीच ठार झाला. तर गोलू वानखडे व शे. बन्नू कुरेशी हे दोघे गंभीर जखमी झाले. या गंभीर जखमींना शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच गोलू वानखडे याचा मृत्यू झाला. तर शे.बन्नू कुरेशी याला गंभीर अवस्थेत अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. एकाच मोटारसायकलवर तीघे सुसाट वेगाने गाडी चालवित हातवारे करीत असताना हॉटेल ओंकार जवळ हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदश्री सांगत आहेत. घटनेची माहिती मिळताच पीएसआय कौराती व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघाताने पातुर्डा गावात शोककळा पसरली आहे.
दुचाकी झाडावर आदळल्याने दोन ठार
By admin | Updated: November 30, 2014 23:10 IST