मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील रोहिणखेड येथील दोन स्वस्त धान्य दुकाने रद्द करून दुकानाकरिता लागणारी संपूर्ण अनामत रक्कम शासनाकडे जमा करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी बुलडाणा यांनी ८ डिसेंबर २0१४ ला दिला आहे. सदर परवान्यास जोडलेल्या गावतील शिधा पत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून जवळच्या स्वस्त धान्य दुकान परवानाधारकास जोडण्याबाबत तहसीलदार मोताळा यांना सूचित केले आहे.रोहिणखेड येथील समाधान तुकाराम वाढे यांच्यासह नागरिकांनी गावातील एन.आर. सोनोने व यू.एस. कचोरे हे दोन स्वस्त धान्य दुकानदार शिधा पत्रिकाधारकांची अडवणूक करतात, त्या शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धन्य मिळत नाही. शिवाय दुकानांवर कोणतेही भाव फलक नसल्यामुळे नागरिकांची दुकानदारांकडून नेहमी फसगत केली जाते. ग्राहकाशी अरेरावीची भाषा वापरत धान्य कमी देऊन पावत्यासुद्धा दिल्या जातात, तसेच शिधापत्रिकेवर खोट्या नोंदी घेतल्या जातात. स्वस्त धान्य दुकानदाराच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले. एपीएल शिधापत्रिकाधारकांना गहू मिळत नाही. या आशयाची तक्रार जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली होती. याप्रकरणी न्याय देण्याची मागणी निवेदनात केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निरीक्षण अधिकारी मलकापूर व पुरवठा निरीक्षक मोताळा यांनी गावातील एन.आर. सोनोने व यू.एस. कचोरे हे दोन स्वस्त धान्य दुकानदारांच्या दुकानाची तपासणी करून तपासणी अहवाल तहसीलदार मोताळा यांना सादर केला. या तपासणी अहवालात सहा प्रकारच्या त्रुटी आढळल्यावरून दि महाराष्ट्र शेड्युल कमोडीटीज (वितरणाचे विनियम) आदेश १९७५ खाली देण्यात आलेल्या प्राधिकार पत्रातील अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. या कारणावरून एन.आर. सोनुने व यू.एस. कचोरे स्वस्त धान्य दुकान रोहिणखेड यांचे स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र वरील संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून त्यांच्या दुकानासंबंधीचे पत्र रद्द करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बुलडाणा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच शिधापत्रिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तेथील शिधापत्रिका जवळच्या स्वस्त धान्य दुकान परवानाधारकास जोडण्याबाबत तहसीलदार यांना सूचित केले आहे. या आदेशाच्या प्रती तहसीलदार मोताळा व रद्दबातल झालेल्या दोनही दुकानदारांना माहितीस्तव पाठविल्या आहेत.
रोहिणखेड येथील दोन स्वस्त धान्य दुकाने रद्द
By admin | Updated: December 10, 2014 00:46 IST