जळगाव : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीसुद्धा भाजपा, भारिप बमसं व काँग्रेस असा त्रिकोणी संघर्ष होण्याची शक्यता आहे. भाजपाची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांनाच मिळण्याची चिन्हे आहेत. तर भारिप बमसंकडून अँड. प्रसेनजीत पाटील हे रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती काँग्रेसच्या उमेदवारीची. मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रामविजय बुरुंगले हे तिसर्या क्रमांकावर असताना आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांना या मतदारसंघात पंचवीस हजार मतांच्या माघारीचा सामना करावा लागल्याने काँग्रेसकडून उमेदवारीसाठी फारसे कोणी इच्छुक राहणार नाही असा अंदाज होता. परंतु तो फोल ठरला. मुंबई येथे काँग्रेसतर्फे पार पडलेल्या मुलाखतीत या मतदारसंघातून तब्बल ३४ जणांनी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठींसमोर आपली बाजू मांडली. याला पक्षातील नवचैतन्य म्हणायचे की नावलौकिकासाठी केलेला खटाटोप म्हणायचा, याचा उलगडा होणे कठीण आहे. तुलनेत भाजपाकडून उमेदवारी मागणार्यांची संख्या फार कमी आहे. विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह फक्त पाच जणांनी उमेदवारी अर्ज केलेत. त्यामध्येही दोघांचे अर्ज हे नाममात्र असून, प्रकाशसेठ ढोकणे व अजय वानखडे हे मात्र सोशल इंजिनिअरिंगचा बेस पुढे करीत सक्षम उमेदवारीचा दावा करीत आहेत. असे असले तरी सलग दहा वर्षापासून या मतदारसंघाची चौफेर बॅटिंग करणारे डॉ. संजय कुटे यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार होऊ शकेल, अशी सध्या तरी स्थिती नाही. त्यामुळे डॉ. कुटे हेसुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना जळगाव मतदारसंघातील पक्षबांधणीचे काम त्यांनी उत्तम प्रकारे केल्यामुळे पक्षांतर्गत विरोध त्यांना नाही तसेच विविध विकास योजना ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू ठरणार आहे. मागील निवडणुकीत दुसर्या क्रमांकावर असलेले भारिप-बमसंचे अँड. प्रसेनजीत पाटील यांनी २0१४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत गत पाच वर्षे मोर्चेबांधणी केली आहे. परंतु मागील निवडणुकीतील माहोल यावेळी कायम ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्नांची मोठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. आदिवासी बांधवांना स्नेहभोज देऊन आणि शेगावातील व्यापारी बांधवांशी चर्चासत्र घेऊन त्यांनी संपर्काचा वेग वाढविला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते नवसंजीवनी मिळाल्यासारखे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मागच्या निवडणुकीत पराभव का झाला किंवा लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला मायनसमध्ये का जावे लागले, याचे चिंतन व मनन न करता काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तरुणांपासून जेष्ठांपर्यंंत सर्वच जण रेसमध्ये आहेत. मागच्या निवडणुकीत तिसर्या क्रमांकावर राहिलेले रामविजय बुरुंगले हे पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यांनी पाच वर्षे जनसेवेचे अभियानच जणू राबविले व संपर्क कायम ठेवला. कालपर्यंंत राकाँशी जवळीक ठेवून असणारे रमेशचंद्र घोलप यांनी काँग्रेसकडून मैदानात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, जि.प. सदस्या ज्योतीताई ढोकणे, प्रदेश चिटणीस अंजलीताई टापरे, डॉ.एस.के.दलाल व अंबादास बाठे हे प्रबळ दावेदार आहेत. तर खालीकबापू देशमुख, संजय उमरकर, शालीग्राम हागे, श्याम डाबरे, प्रकाश देशमुख, कैलास बोडखे, बाबू जमादार, अमर पाचपोर, राजीव घुटे, राजेश्वरराव देशमुख आदींनी मुलाखती दिल्या आहेत. मनसेचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यांची उमेदवारी ही भाजपासाठी चिंतेची ठरणार आहे. याशिवाय आणखी काही नवीन व राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरणार असले तरी सध्या लक्ष आहे ते काँग्रेसच्या उमेदवारीकडे ती जाहीर झाली की चित्र स्पष्ट होईल.
त्रिकोनी संघर्षात काट्याची लढत
By admin | Updated: August 21, 2014 23:24 IST