शेगाव (जि. बुलडाणा): येथील पथ मोहल्ला भागात जुन्या वादातून एकाच समाजातील दोन गटांत तुफान हाणामारी झाली. ही घटना रविवारी दुपारी घडली. यामधे एकूण १४ जण गंभीर झाल्याचे समजते. शहरातील पेठ मोहल्ला भागातील बैतुलबी शेख ख्वाजा कुरैशी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा हनीफ याने काल्या ऊर्फ शे. मोबीन शे. मोहम्मद याच्याकडून ३00 रुपये उसनवारीने घेतले होते. पैसे देण्यास विलंब झाल्याने रविवारी दुपारी शे. मोबीनने सहकार्यांसोबत लाठय़ा-काठय़ा, लोखंडी पाइप आणि तलवारीने कुटुंबीयांवर हल्ला चढवला तसेच उपस्थितांनाही जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी काल्या ऊर्फ शे. मोबीन याच्यासह सुमारे २५ जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३0७, ५0४, ५0६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक तावडे, पोलीस कॉन्स्टेबल वानखडे करीत आहेत. दुसरीकडे शे. अब्बास शे. रशीद (२0 रा. दौलतपुरा) यानेही पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, शेख हफिज शे. ख्वाजा कुरैशी यांच्यासह २0 ते २५ जणांनी जुन्या वादातून सहकार्यांसमवेत लाठय़ा-काठय़ा, लोखंडी पाइप आणि तलवारीने कुटुंबीयांवर वार केले. शे. अब्बास शे. रशीद याच्या तक्रारीवरून शेख हफिज व सहकार्यांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत. हाणामारीच्या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार बाविस्कर यांनी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दोन गटांत तुफान हाणामारी
By admin | Updated: August 31, 2015 01:26 IST