ब्रम्हानंद जाधव/ मेहकर : राज्यात गत सहा वर्षांपासून टोमॅटोचे ५७ लाख टन उत्पादन झाले; परंतु मागणीच्या तुलनेत टोमॅटोचे उत्पादन, पुरवठा जास्त असल्याने दर कोसळलेले राहत आहेत. परिणामी टोमॅटो उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकर्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. या परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत.राज्यातील पीकक्षेत्रातील सुमारे २९ हजार ११0 हेक्टर क्षेत्र हे टोमॅटो लागवडीखालील आहे. खरीप, रब्बी हंगाम तसेच उन्हाळ्यातही टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो उत्पादन घेण्याकडे विदर्भातील शेतकर्यांचाही कल वाढला आहे. राज्यात गत सहा वर्षापासून टोमॅटो लागवड क्षेत्रामध्ये दीडपटीने वाढ झाली आहे. राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली या जिल्ह्यांपाठोपाठ पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. सन २00९ पासून राज्यात ५६ लाख ८९ हजार टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले आहे. टोमॅटोचे उत्पादन मागणीच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकर्यांना टोमॅटोची अत्यंत कमी भावात विक्री करावी लागत आहे. टोमॅटो उत्पादनासाठी एकरी सरासरी ७0 हजार रुपये खर्च येत असून, उत्पादन सरासरी पाच ते सहा टन होत आहे. वार्षिक सरासरी १0 ते १२ रुपये किलो दर टोमॅटोला राहत असल्याने शेतकर्यांचा उत्पादनखर्चही भरून निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येत आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन व पुरवठा जास्त असल्याने टोमॅटोचे दरवर्षी घसरलेले दर शेतकर्यांच्या कर्जबाजारीपणात भर टाकत आहेत.
टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली
By admin | Updated: March 12, 2015 01:55 IST