डोणगाव : सध्या बळीराजा संकटात असतानाच भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून, मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख परिसरात एकाच रात्री तीन शेतकर्यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या तोट्या लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन पीक सुकण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे ओलीताची सोय असलेल्या शेतकर्यांनी सोयाबीन पिकाला उन्हापासून वाचविण्यासाठी सद्यस्थितीत स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देणे सुरु केले आहे; परंतु पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा वेळोवेळी गायब राहत असल्याने शेतकर्यांना रात्रीबेरात्री पिकाला पाणी द्यावे लागत आहे. त्यासाठी रात्रीच्यावेळी विद्युत मोटरपंप, स्प्रिंकलर पाईप आदी महागडे कृषीपयोगी साहित्य शेतकर्यांना शेतात ठेवावे लागत आहे. या महागड्या कृषीपयोगी साहित्यावर आता भुरट्या चोरट्यांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे शे तकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरा देशमुख येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन शेतकर्यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या ४५ तोट्या लंपास केल्या आहेत. त्यामध्ये शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. उमरा देशमुख येथील गजानन आबाराव देशमुख यांचे गावाला लागूनच शेत आहे. त्यांच्या शेतात स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देणे सुरु होते. शेतकरी गजानन देशमुख हे शेतातून घरी आले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या स् िप्रंकलरच्या १६ तोट्या लंपास केल्या आहेत. त्याचबरोबर येथीलच भागवत रंगराव देशमुख यांच्या १३ तोट्या व मिलिंद दौलत खंडारे यांच्या शेतातून १२ तोट्या लंपास करण्यात आल्या आहे. या तिन्ही शेतकर्यांचे एकूण ४0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भुरट्या चोरांनी आपला मोर्चा शेतातील साहित्य लंपास करण्यावर सुरू केला असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तरी पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून भुरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गजानन देशमुख, भागवत देशमुख, मिलिंद खंडारे यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.
चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Updated: September 27, 2014 00:04 IST