बुलडाणा : सोयाबीनने ऐनवेळी दगा दिल्याने शेतकर्यांची यंदाची दिवाळी जेमतेम गेली. त्यामुळे दिवाळीचा व्यवसाय नोकरदार वर्गावरच अवलंबून होता. त्यातही यावर्षी नुकतीच निवडणूक झाल्याने दिवाळीच्या बाजारात बर्यापैकी खरेदीची रौनक दिसून आली. दिवाळीच्या तीन दिवसांत बुलडाणा शहरात तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. यामध्ये सराफा व्यवसाय यावर्षी आघाडीवर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे भाव तब्बल साडेतीन हजार रुपये उतरल्याने सराफा बाजार तेजीत होता. बुलडाण्याचा सराफा बाजार फार प्रसिद्ध नसला तरी नोकरदार वर्ग दिवाळीला सोन्याची खरेदी हमखास करतो. लक्ष्मीपूजनाला महालक्ष्मीचे चांदीचे शिक्के मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जातात. यावर्षी धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला सराफा बाजार महिला-पुरुषांनी फुलून गेला होता. खामगाव येथील शुद्ध चांदी सर्वदूर प्रसिद्ध आहे. बुलडाणा येथील सराफा बाजारात खामगावची चांदी असते. यावर्षी चांदीच्या किमतीतही घसरण झाल्याने अनेकांनी मोठी खरेदी केली. ही खरेदी भाऊबिजेच्या दिवशीही सुरू असल्याचे बाजारपेठेत दिसून आले. *झेंडूच्या फुलांचा रंग फिका दिवाळी सणाच्या मंगलमय वातावरणाला झेंडूच्या फुलांनी वेगळीच झळाळी येते. आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे घराला तोरण हे दिवाळीचे खास वैशिष्ट्य. मात्र, यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन वाढल्यामुळे कवडीमोल भाव मिळाला. यावर्षी पाऊस उशिरा आला तरी झेंडूचे उत्पादन भरपूर झाले. आवक जादा झाल्याने शेतकर्यांना अखेर कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी तर शेतकर्यांना उरलेली फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागली. *३0 लाखांचे उडाले फटाकेदिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन झाले की, फटाके उडविण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजनाच्या अवघ्या चार तासांत नागरिकांनी ३0 लाख रु पयांच्या फटाक्याची आतषबाजी केली. बुलडाणा शहरात यावर्षी फटाक्यांची ४१ दुकाने लागली होती. यावर्षी मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांबरोबरच शोभिवंत फटाक्यालाही मोठी मागणी होती. याशिवाय गरीब, शेतकरी-शेतमजुरांसाठी नेहमीचे हलके व कमी किंमतीच्या फटाक्यांचीसुद्धा बर्यापैकी विक्री झाली.
दिवाळीच्या दिवसांत कोटींची उलाढाल
By admin | Updated: October 26, 2014 23:56 IST