खामगाव (जि. बुलडाणा) : बेवारस सायकली, गुन्ह्यातील मोटारसायकली व साहित्य विकताना शासन नियमांचे उल्लंघन करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शहर पो.स्टे.चे तत्कालीन ठाणेदार दिलीप पाटील यांना २६ मार्च रोजी तडकाफडकी आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या लक्षवेधी मागणीवर गृहराज्य मंत्री ना. राम शिंदे यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. खामगाव शहर पो.स्टे.चे नुकतेच बदलून गेलेले ठाणेदार दिलीप पाटील यांनी २७ मे २0१४ रोजी ६५ बेवारस सायकलींसह काही मोटारसायकली व गुन्ह्यातील साहित्यांची लिलावाद्वारे विक्री केली होती. २0 वर्षांपासून बेवारस असलेल्या सायकली विकण्यासाठी ठाणेदार पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांना २८ एप्रिल २0१४ रोजी विनंती केली होती. त्यानुसार २९ एप्रिल २0१४ रोजी लिलावाबाबतचा जाहीरनामा काढून १ महिन्याची मुदत देऊन जाहीरनाम्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्याचे पत्र ठाणेदारांना देण्यात आले होते. त्यानंतर ठाणेदार पाटील यांनी ३0 एप्रिल २0१४ रोजी जाहीरनामा काढल्याचा अहवाल व मूल्यांकन केल्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकार्यांना दिला. २१ मे २0१४ रोजी ६५ सायकली लिलावाद्वारे विकण्याची परवानगी उपविभागीय अधिकार्यांनी दिल्यानंतर २७ मे २0१४ रोजी वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात मर्जीतल्या एकालाच ठाणेदारांनी सायकली व साहित्य विकले. यातून दाखविलेली रक्कम सुमारे दोन महिने वापरली व नंतर खात्यात जमा केली. तसेच २७ मे २0१४ रोजी लिलावात विक्री झालेली एक मोटारसायकल पुन्हा लिलावाच्या २0 डिसेंबर २0१४ च्या जाहीरनाम्याच्या जाहिरातीत नमूद करण्यात आली, असे मुद्दे उपस्थित करून या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात घोळ झाल्याचे आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे उपस्थित करून ठाणेदार पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे केली. आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी या प्रक्रियेची संपूर्ण माहिती सभागृहात मांडली.
ठाणेदार पाटील निलंबित
By admin | Updated: March 27, 2015 01:38 IST