चिखली (जि. बुलडाणा): खरीप पिकांना सरंक्षण पुरविण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पीकविमा योजनेचे कृषी विभागामार्फत दिले जाणारे प्रस्ताव नाकारून बँकेमार्फत दिल्या जाणार्या विहित नमुन्यातील प्रस्ताव पुन्हा भरून देण्याची सक्ती येथील स्टेट बँकेच्या अधिकार्यांनी चालविली आहे. बँकेच्या अधिकार्यांच्या या हेकेखोरपणामुळे शेतकर्यांची ससेहोलपट होत आहे. शिवसेनेचे युवा नेते कपिल खेडेकर यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पदाधिकार्यांसह गुरुवारी स्टेट बँकेत धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. कृषी विभागाने दिलेले पीकविम्याचे प्रस्ताव इतर सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्वीकारण्यात येत असताना केवळ स्टेट बँकेच्या चिखली शाखेतच हे अर्ज फेटाळून लावण्यात येत आहेत, तर स्टेट बँकेकडून खातेदारांना मिळणारे प्रस्ताव भरून देण्यास कृषी विभागाकडून नकार दिला जात आहे. पीकविमा प्रस्तावाच्या या दुष्टचक्रात शेतकरी भरडला जात आहे. शेलूद येथील भाऊराव हिंमतरव इंगळे, गजानन त्र्यंबक गावडे, त्र्यंबक काळूबा गावडे या शेतकर्यांनी राष्ट्रीय पीकविमा योजना हंगाम २0१५ अंतर्गत भरावयाचा विमा प्रस्तावपत्रक कृषी विभागामार्फत तयार करून घेतले आणि ९ जुलै रोजी स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेत दाखल करण्यासाठी गेले. तेथील क्षेत्रीय अधिकारी सुधीर करांडे यांनी सदर प्रस्ताव शेतकर्यांच्या अंगावरच भिरकावून दिले. याची शिवसेना पदाधिकार्यांनी दखल घेत, बँकेचे क्षेत्रीय अधिकारी करांडे यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. यामुळे संतप्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहरप्रमुख निलेश अंजनकर, कपिल खेडेकर, बाजार समिती संचालक गजानन पवार यांच्यासह शेतकरी व शिवसैनिकांनी बँकेतच ठिय्या मांडला.
शिवसेनेचे बँकेत ठिय्या आंदोलन
By admin | Updated: July 10, 2015 00:02 IST