मोताळा हद्दीत चोरीच्या दुचाकींची डील होणार असल्याची गुप्त माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अनिल भुसारी, पोकाँ मंगेश पाटील, पोकाँ सुनील थोरात, पोकाँ सुनील भवटे यांनी मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मोताळा-नांदुरा मार्गावर सापळा रचला. तीन पल्सर दुचाकी सुसाट वेगाने आल्या. यावर सात ते आठ जण बसलेले होते. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दोन दुचाकी चालक त्यांना चकमा देत नांदुरा रस्त्याकडे निघाले. तिसरी दुचाकी मागे फिरली. दरम्यान, पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. संशयितांनी शेंबा येथून टाकरखेड गावाकडे मोर्चा वळवला. पोलिसांनी टाकरखेड गावात एका दुचाकीवर झडप घालून एका युवकास पकडले. त्याचा सहकारी मात्र फरार झाला. मोताळ्याकडे परत फिरलेल्या दुचाकीला पोलिसांनी अडवले असता, संशयितांनी गाडी सोडून जंगलात पळ काढला. पोलिसांनी संशयित आरोपी गजानन रामभाऊ जाधव, रा. येवती, ता. लोणार व दोन पल्सर दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. वृत्त लिहीपर्यंत बोराखेडी पोलिसांची कार्यवाही सुरू होती.
संशयित दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:34 IST