मेहकर (बुलडाणा): एटीएम नव्यानेच हाताळणार्या व्यक्तीला पैसे काढून देतो, असे सांगून एटीएम कार्डची अदलाबदली करून परस्पर खात्यातून रक्कम काढणार्यास मेहकर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी अटक केली. अंजनी बु. येथील दशरथ विठ्ठल नेहूल हे २८ डिसेंबर २0१५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेहकर शाखेच्या एटीएमवर मुलांना पैसे पाठविण्यासाठी गेले होते. तेथे मेहकर येथीलच अ. मोहसीन अ. हाशम याने दशरथ नेहूल यांना मी तुमच्या मुलांना पैसे ट्रान्सफर करून देतो, असे सांगून त्यांच्या हातात पैसे काढून दिले; मात्र त्यांचे एटीएम कार्ड परत न करता, दुसर्याचे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्याने दशरथ नेहूल यांच्या एटीएममधून ४0 हजार रुपये काढून घेतले. यासंदर्भात दशरथ नेहूल यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक अ. सईद यांनी एटीएम मशीनच्या सीसी कॅमेर्याच्या साहाय्याने तपासणी करुन आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. आरोपी अ. मोहसीन अ. हाशम यास मेहकर न्यायालयात सोमवारी हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. यासंदर्भात अ. सईद पुढील तपास करीत आहेत. यापूर्वीही अशा घटना परिसरात घडल्याने स्वत:चे एटीएम कार्ड दुसर्याला देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
एटीएममधून रक्कम परस्पर काढणा-यास अटक
By admin | Updated: February 16, 2016 00:55 IST