सोनाळा (जि. बुलडाणा) : बावनबीर-सोनाळा रस्ता डांबरीकरण व नुतनीकरणाच्या मागणीसाठी सोनाळा सर्कलमधील जवळपास दोन हजार नागरिकांनी बुधवारी जंबो रास्ता रोको आंदोलन केले. सहा तिर्थस्थळांना जोडणारा हा रस्ता असल्याने तो त्वरेने पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. वासुदेवराव गावंडे, जिल्हा परिषद सदस्य नलीनी गावंडे यांच्या नेतृत्त्वात सर्कलमधील सरपंच, उपसरपंचासंह मोठय़ा संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. सोनाळा बसस्थानकावरच मंडप टाकून हा रास्ता रोको करण्यात आला. पाच किमीच्या या मार्गावर सहा तिर्थ आहेत. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची लगोलग दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मांगलेश्वर यांनी येथे भेट देऊन राज्य शासनाकडून या मार्गासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. सोबतच सोनाळा-बावनबीर आणि पळसोडा-खळद या दोन्ही रस्त्यासह मुख्य जिल्हा मार्गाच्या दर्जावाढीसाठीचाही प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले. तसे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन नागरिकांनी स्थगित केले.