अमडापूर (जि. बुलडाणा) : नजिकच्या कव्हळा येथे सोयाबीन गंजीला आग लागून २ लाख ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. कव्हळा येथील शेतकरी रामकिसन ज्ञानबा लांडे यांनी ३ नोव्हेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली की, शिवारातील सहा एकर शेतात सोयाबीन सोंगून गंजी लावली होती. ३ नोव्हेंबर रोजी मध्य रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने सोयाबीन गंजीला आग लावली. यात ६0 क्विंटल सोयाबीन जळून २ लाख ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी लांडे शेतात गेले तेव्हा सोयाबीन गंजी पूर्णत: जळून खाक झाल्याचे दिसून आले. या तक्रारीच्या आधारे अमडापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. अमडापूर परिसरात सोयाबीन गंजीला आग लागून जाळण्याची गत पंधरा दिवसातली ही चौथी घटना असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोयाबीन गंजीला आग
By admin | Updated: November 4, 2015 02:56 IST