खामगाव : येत्या २0 ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान राज्यात सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा होत आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने अधीनस्त कार्यालयांना दिले आहेत.राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणार्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे या उद्देशाने या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी २0 ऑगस्ट हा सद्भावना दिवस माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सद्भावना शर्यतीचे आयोजन करावे. तसेच सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा देण्यात यावी. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हय़ाच्या मुख्यालयात व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात यावी व उपस्थितांना सद्भावना शपथ घेण्यास सांगण्यात यावे. युवकांच्या सहभागाने समूहगान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावे. विद्यापीठ, शाळा, महाविद्यालय येथेसुद्धा यानिमित्त कार्यक्रम घेण्यात यावे. पंधरवडादरम्यान सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसूत करण्यासाठी मानवी साखळी कार्यक्रम घ्यावा. युवक परिषद घेऊन स्वातंत्र्य सैनिकांना भाषणासाठी निमंत्रित करावे. तसेच मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे, असे निर्देश याबाबत शासनाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.
खामगावात २0 ऑगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा
By admin | Updated: August 18, 2014 00:17 IST