अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या मापात पाप असल्याची धक्कादायक वस्तूस्थिती समोर आली असून, दोषयुक्त इलेक्ट्रानिक काटा वैद्यमापन शास्त्र विभागाने जप्त केला आहे. या कारवाईमुळे महामंडळ व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गत कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराने वजन मापातील फरकाचे धान्य खाणारा तो बकासूर कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. भारतीय खाद्य निगमचे खामगाव-अकोला रस्त्यावरील गोदाम आहे. या गोदामात येणारे आणि गोदामातून शासकीय वितरणासाठी दिल्या जाणाºया धान्याच्या मोजमापासाठी वे-ब्रिजवर इलेक्ट्रानिक्स काटा लावण्यात आला आहे. हा काटा भारतीय वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाकडून प्रमाणित करण्यात आला आहे. मात्र, गत काही दिवसांपूर्वी भारतीय वैद्य मापन विभागाची कोणतीही परवानगी न घेता भारतीय खाद्य निगमने करार पध्दतीने घेतलेल्या ब्लॅक स्टोन वे-ब्रिजवरील इलेक्ट्रानिक्स काट्याचे इंडिकेटर बदलण्यात आले. त्यामुळे शासकीय धान्याची वाहतूक करणाºया कंत्राटदारांना ट्रकमागे वजनापेक्षा ५० ते ७५ किलो धान्य कमी मिळू लागले. याप्रकरणी कंत्राटदारांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार केल्यानंतर भारतीय खाद्य महामंडळाच्या अख्यारीतील वजन काट्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वैद्यमापन विभागाने प्रमाणित केलेला इलेक्ट्रानिक्स काटा येथे आढळून आला नाही. तसेच इलेक्ट्रानिक्स काट्यात छेडछाड केल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आढळून आल्याने बुधवारी वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाचे निरिक्षक प्रदीप शेरकार यांनी हा काटा जप्त केला. यावेळी ब्लॅक स्टोन वे-ब्रिज लॉजीस्टिकचे व्यवस्थापक राहुल मच्छिंद्र, भारतीय खाद्य निगमचे साठा अधिक्षक किसन फकीरा भवर, कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कारवाईमुळे भारतीय खाद्य निगम आणि ब्लॅक स्टोन वे-ब्रिज लॉजीस्टीक व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई दडपण्यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाच्या अधिकाºयांवर दडपणाचाही प्रयत्न झाला.
फरकातील धान्य जाते तरी कोठे?
भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील काट्याचे इंडीकेटर बदलवून धान्य मोजून देताना मोठा घोळ केल्या जातो. गोदामावरून धान्य मोजून दिल्यानंतर कंत्राटदारांना धान्य कमी मिळत होते. त्यामुळे कंत्राटदारांच्या तक्रारीवरून काट्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान, केंद्राशासनाकडून भारतीय खाद्य निगमच्या गोदामात आणि वितरणासाठी रेल्वेने (रॅक) आलेल्या धान्याचे मोजमाप केल्यानंतर फरकातील धान्य जाते तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय खाद्य निगमने करारबद्ध केलेल्या ब्लॅक स्टोन वे-ब्रिजवरील इलेक्ट्रॉनिक काट्याच्या इंडिकेटरमध्ये बदल करण्यात आला. याबाबत व्यवस्थापकांना विचारले असता त्यांनी इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्याने बदलल्याचे सांगितले. तथापि, वजन मापात कोणताही करावयाचा असल्यास त्याची माहिती वैद्यमापन विभागाला देणे बंधनकारक आहे. नेमकी हीच माहिती लपविण्यात आल्याने काटा जप्त केला आहे.
-प्रदीप शेरकार निरिक्षक, वैद्यमापन शास्त्र खामगाव, विभाग ---