लोणार : गेले २७ वर्षे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्रा. बळीराम मापारी यांची जिल्हाप्रमुख म्हणून वर्णी लागल्यापासून तालुकाप्रमुख पद रिक्त झाले आहे. परंतु एक वर्ष उलटून सुद्धा अजूनपर्यंत नवीन तालुकाप्रमुख पदी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने तालुक्यातील शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळते आहे .
गेल्या एक वर्षापासून तालुकाप्रमुख पद रिक्त असल्याने अनेक इच्छुकांनी खा प्रतापराव जाधव यांच्याकडे गेल्या वर्षभरात ‘सेटिंग’ करून बघितली. परंतु अद्यापही खा. जाधवांनी आपला कौल उघड केला नाही . मेहकर मतदारसंघात सध्या शिवसेना गल्लीपासून मंत्रालयापर्यंत सत्तेत असल्याने या पदाला लोणार तालुक्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असून हीच खरी डोकेदुखी शीर्ष नेतृत्वाला असल्याने नवीन निवडीला विलंब होत असल्याचे खात्रीलायक माहिती आहे. एका नावावर शिक्कामोर्तब करून उरलेल्या इच्छुकांची नाराजी नको या भावनेतून सध्या खा. जाधव व आ. रायमूलकर यांनी हा विषय अजून हाताळलेला नाही. परंतु या विलंबामुळे सर्वसामान्य शिवसैनिक व इच्छुक मात्र कमालीचे अस्वस्थ दिसून येत असल्याने तालुक्यातील शिवसेनेत सर्वकाही ‘ऑल इज वेल’ नसल्याचे एकंदरीत चित्र आहे . गेले २७ वर्ष प्रा. मापारी यांनी तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्व सक्षमपणे केले. त्याचे फलित म्हणून पक्षाने व खा. प्रतापराव जाधव यांनी अनेक सत्तेची पदे त्यांना दिली. त्यांनी सुद्धा या पदाचा वापर तालुक्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी केला. त्यामुळेच त्यांची आता जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती केली गेली आहे. परंतु त्यांना पर्याय म्हणून बरेच दिग्गज शिवसैनिक तालुक्यात असून सुद्धा गेल्या वर्षभरात एकाही नावावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून शिक्कामोर्तब होत नसल्याने तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे . त्यामुळेच तालुक्याला केव्हा नवीन तालुकाप्रमुख मिळेल याकडे सर्वसामान्य शिवसैनिक डोळे लावून बसले असल्याचे चित्र तालुक्यातील शिवसैनिकात दिसून येत आहे