चिखली : तालुक्यातील जांभोरा येथील जि.प. शाळेवर कार्यरत शिक्षकाची कायमस्वरूपी बदली करावी, या ग्रामस्थांच्या मागणीकडे गत १३ वर्षांंपासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी ३0 एप्रिलपासून शाळाबंद आंदोलन छेडले असून, १ मे रोजीच्या निकालवरही बहिष्कार टाकला आहे. जांभोरा येथील जि.प. शाळेवर कार्यरत डी.व्ही. परिहार या शिक्षकाच्या कार्यप्रणालीवर नाखूष असलेल्या ग्रामस्थांनी त्यांची येथून कायमस्वरूपी बदली करावी ही मागणी गत १३ वर्षांपासून लावून धरली आहे; मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत या ठिकाणी वारंवार तडजोडीचा प्रयत्न करून पुन्हा परिहार यांचीच नियुक्ती होत असल्याने गत २९ एप्रिल रोजी डी.व्ही. परिहार शाळेवर रुजू होण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी त्यांना रुजू होण्यास मज्जाव केला आहे. याशिवाय या ग्रामस्थांना शाळेवर परिहार नको असताना तसेच त्यासाठी वारंवार तक्रारी व शाळा बंद आंदोलन करूनही शिक्षण विभागाकडून परिहार यांचीच नियुक्ती करीत असल्याने यावेळी शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त करून ३0 एप्रिलपासून शाळा बंद आंदोलन छेडले आहे. दरम्यान, १ मे रोजीच्या निकालावरही ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्यामुळे महाराष्ट्रदिनी विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांशिवाय येथे केवळ मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांनीच ध्वजारोहण केले आहे.
ग्रामस्थांचा शाळा व निकालावर बहिष्कार
By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST