बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातील राजकीय पक्षांसह उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रचाराचा जोरदार धुराळा उडत आहे. दररोज मतांचे गणित मांडून विजयाचे पारडे कमी-जास्त होत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. त्यामुळे सट्टाबाजारातील उलाढालीवरही मतदारांचे लक्ष वेधले आहे. सट्टाबाजारात ज्या उमेदवाराचा भाव कमी, तो उमेदवार विजयाच्या दिशेने सरकत असल्याचा संकेत असतो. मात्र, सध्या या बाजारामध्येही संभ्रम व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना या चार प्रमुख पक्षांसह मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव व मेहकर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भारिप, तर बुलडाणा, सिंदखेडराजा व जळगाव जामोद या मतदारसंघांमध्ये मनसेचेही आव्हान मोठय़ा प्रमाणात मतविभाजन करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर संध्याकाळी व दुसर्या दिवशी भाजप उमेदवारांचे भाव कमी झाले होते; पुन्हा ते अनेक मतदारसंघांमध्ये वाढताना दिसत आहे. विजयाची हवा पाहून हे भाव ठरविले जात असून, त्यामध्ये दररोज होणारा चढउतार सट्टाबाजारातही संभ्रम निर्माण करणारा ठरला. अनेक बहाद्दरांनी पैसा लावल्याने ते बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.
*एकेका मतासाठी सुरू आहे शोधमोहीम
उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मतविभाजन मोठय़ा प्रमाणात होणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते कमी करण्याच्या प्रयत्नात आपल्या बाजूचेएक -एक मत महत्त्वाचे ठरणार असल्याची जाणीव उमेदवारांना झाल्यामुळे आता नातेवाईक, पाहुणे, मित्र आणि मित्राचा मित्र अशी नाती तसेच शत्रूच्या शत्रूचा शोध घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड उमेदवारांतर्फे होत आहे. प्रत्यक्ष तसेच मोबाईलच्या माध्यमातून अशा मतदारांशी संपर्क साधून त्यात उमेदवारांची भूमिका समजून देण्यासह त्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
*मतांच्या विक्रीची भीती
युती व आघाडी तुटल्यामुळे चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाल्याने एक, एक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतांच्या खरेदी-विक्रीसोबतच पोस्टल बॅलेटला किंमत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निकालातील मतांचा फरक हा सात ते दहा हजारांच्या आत राहण्याची शक्यता असल्याने काही उमेदवारांनी शासकीय कर्मचार्यांचे पोस्टल बॅलेट विकत घेण्याच्या तयारी केली आहे. या प्रकाराची प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.