मनोज पाटील - मलकापूरप्रेम हे आंधळं असतं... त्याला कोणतीही जात, धर्म अथवा भाषा नसते... असे म्हणतात...पण कधी-कधी या प्रेमाचा अंत हा भयावह होतो. असाच प्रेमाचा अंत सैराट या मराठी चित्रपटात दाखविण्यात आला आहे.. अगदी असाच भयावह अनुभव मंगळवारी दुपारी मलकापूर तालुक्यातील निमखेड गावात आला. ज्या पोटच्या गोळ्याला जिवापाड जपल्या जाते, त्याच गोळ्याला निर्दयीपणे पित्याकडून संपवलं गेलं. पित्याच्या या कौर्यामुळे समाजमन मात्र सुन्न झालं आहे.गणेश गजानन हिंगणे व मनिषा बाळु हिवरे दोघेही निमखेड येथीलच रहिवाशी. दोघांचीही घरे हाकेच्याच अंतरावर... दोघांचेही शिक्षण जेमतेम सारखेच... १२ वीपर्यंतचे. अशा जवळीकतेतून यांचे प्रेमाचे नाते जुळले. या प्रेमाचा गंधही कुणाला आला नाही. त्यांचे प्रेम फुलले ... बहरले अन् साता जन्माच्या आणाभाका घेत ते दोघे विवाहबद्धही झाले. ते मनाने एक झाले; पण त्यांची जात एक नव्हती व नेमकी हीच बाब तिच्या पित्याला खटकली. सामाजिक विरोधापेक्षा कौटुंबिक विरोध हा प्रेमात आडवा आलाच.. मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा प्रचंड राग मुलीचे वडील बाळु रामा हिवरे (६० वर्षे) यांना आला.२६ मार्चला विवाह करून दोघेही ५-६ दिवस मलकापुरात राहिले व ४-५ दिवसआधीच निमखेडला गेले; पण ११ दिवसातच त्यांच्या प्रेमाचा सैराटसारखाच करुण अंत झाला. पोटच्या गोळ्याला खुद्द वडिलांनीच निर्दयीपणे ठार केले. अमानवीय घटना घडली. ज्या मुलीला जिवापाड जपले त्याच मुलीला वडिलांनी केवळ आंतरजातीय विवाह केल्यामुळे ठार मारले. चित्रपटातील कथानक वास्तवातही घडावे, अशीच समाजमन हेलावून सोडणारी घटना घडली. त्यामुळे हा एक चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे. निर्दयी पित्यास दोन दिवसांची पोलीस कोठडीनवविवाहीत मुलीच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या जन्मदात्या आरोपी पित्याला ६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता मलकापूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने निर्दयी पित्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनाविरुद्ध मुलीने गणेश हिंगणे नामक तरूणाशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. हा राग मनात ठेवून आरोपी बाळु रामा हिवरे या ६० वर्षीय पित्याने मनिषा ही घरी एकटीच असल्याचा डाव साधीत खून केला. याप्रकरणी मृत नवविवाहितेचा पती गणेश हिंगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले. त्यानंतर ६ एप्रिल रोजी आरोपी बाळु हिवरे यास मलकापूर येथील प्रथम वर्ग कोर्ट नं.२ समोर बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी अविनाश भामरे यांनी हजर केले असता, ८ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्त्या अॅड.कस्तुरे यांनी काम पाहिले.