बुलडाणा : आरटीइई अंतर्गत दरवर्षी हजाराे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येताे. या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना मिळते. सत्र २०१९-२०साठी एक रुपयाही शाळांना मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया संकटात सापडल्याचे चित्र आहे.
सन २०१२-१३ पासून जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. सुरुवातीच्या पाच वर्षांत शाळांना शंभर टक्के परतावा मिळाला आहे. मात्र, शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये ७५ टक्के रक्कमच वाटप करण्यात आली. शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये ३४ टक्के वाटप करण्यात आले. ६६ टक्के रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचे चित्र आहे. तसेच शैक्षिणक सत्र २०१९-२० साठी तर शिक्षण विभागाला एक रुपयाही मिळाला नसल्याचे चित्र आहे.
प्रवेश प्रक्रिया जाहीर
गत तीन वर्षांपासून शाळांना शुल्काची रक्कम मिळालेली नाही. अशातच शिक्षण विभागाने सन २०२१-२२साठी आरटीई अंतर्गंत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांची नाेंदणीही सुरू झाली असून, ९ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यात येणार आहे.
२०१७-१८ या वर्षात ७५ टक्केच मिळाले
शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये १४० शाळांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये एकूण ६ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. त्यासाठी शिक्षण विभागाने ३ काेटी ३९ लाख ५८ हजार २५६ रुपयांची मागणी केली हाेती. प्रत्यक्षात ४ काेटी ११ लाख २७ हजार ७६२ रुपयेच मिळाले आहेत.
२०१८-१९ या वर्षात ६६ टक्के कमी मिळाले
शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये १८३ शाळांनी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ७ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. शिक्षण विभागाने पाच काेटी ६२ लाख ८८ हजार ८६० रुपयांची मागणी केली हाेती. त्यापैकी केवळ एक काेटी ७० लाख ५३ हजार रुपयेच जिल्ह्याला मिळाले आहेत.
२०१९-२० या वर्षात निधीची प्रतीक्षाच
शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये १९८ शाळांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये एकूण ९ हजार २४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. त्यासाठी शिक्षण विभागाने सात काेटी ८९ लाख ४१ हजार ९३४ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, एक वर्ष लाेटल्यानंतरही शिक्षण विभागाला एक रुपयाही मिळालेला नाही. तसेच सन २०२०-२१चेही पैसे मिळालेले नाही. त्यामुळे, आरटीइ अंतर्गंत हाेणारी प्रवेश प्रक्रिया संकटात सापडली आहे.