संग्रामपूर (बुलडाणा): परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीनचे दाणे बारीक झाले, तर कोरडवाहू कपाशी धोक्यात आली आहे. दिवाळीच्या सणासह वर्षभराचा आर्थिक गाडा कसा चालवावा, याची चिंता तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांसमोर उभी ठाकली आहे.यंदाच्या हंगामात सुरवातीलाच पेरणीचा ताळमेळ हुकल्याने दोन ते तीन वेळा पेरणी करण्याची वेळ आली. यामध्ये बियाण्यासह मजुरीवर आलेला खर्च पाहता, कमीत कमी सोयाबीनची एकरी आठ ते दहा क्विंटलच्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, परतीचा पाऊस कोसळला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पक्व होण्याआधीच सुकल्या व दाणे बारीक राहिले. सद्य:स्थितीत एकरी दीड क्विंटलपासून तर चार-पाच क्विंटलपर्यंंत उत्पादनाचे आकडे येत आहेत. सोंगणीचा एकरी हजार व थ्रेशरचे एकरी हजार असा दोन हजार रुपये, शिवाय आतापर्यंतचा खर्च लक्षात घेता, सोयाबीन कोणत्याच भावात परवडणारे झाले आहे. अशातच सोयाबीनला बाजारात क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपये असलेला भाव शेतकर्यांसाठी मारक आहे. पाऊसच नसल्याने तुरीचे पीकही धोक्यात आले आहे. सोयाबीनमध्ये हुकले तरी तुरीमध्ये जमेल, ही आशाही मावळताना दिसत आहे. यासोबतच कोरडवाहू कपाशीचे भवितव्य खराब आहे. अजूनही कपाशीची झाडे मोसमात येताना दिसत नाही. थंडीचा जोरही नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याचे चित्र दिसत आहे.
पावसाचा दगा; उत्पादन घटले
By admin | Updated: October 18, 2014 23:58 IST