राहेरी बु : एका कृषी कंपनीच्या एरिया मॅनेजरला शस्त्रांच्या धाकावर लुटणाऱ्या दाेन आराेपींना किनगाव राजा पाेलिसांनी २८ जूनराेजी काही तासातच जेरबंद केले. त्यांच्याकडून चाेरी केलेला ऐवज जप्त केला़. दाेन्ही आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्दडी परिसरात साेमवारी जाेरदार पाऊस झाल्याने नाले भरुन वाहत होते. वदर्डी ते सोनोशी रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे एका कृषी कंपनीचे एरिया मॅनेजर पराग विलास मिरकुटे (रा. मुगळा, ता. वाशिम, ह. मु. देऊळगावराजा) हे त्यांच्या दुचाकीसह पुलाजवळ थांबले होते. तेथे दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीजवळ येऊन थांबले व त्यांनी मिरकुटे यांची चाैकशी केली़. मिरकुटे यांनी ओळख दिल्यानंतर त्या दाेघांनी त्यांना वर्दडी ते पिंपरखेड बु. हा पर्यायी मार्ग असल्याचे सांगितले. तसेच जंगल भागामध्ये मिरकुटे यांची दुचाकी थांबवून शस्त्राच्या धाकावर त्यांच्याकडील पैशाचे पाकीट, हातातील घड्याळ, मोबाईल व दुचाकी असा ४७ हजार ७५० रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला़. या घटनेमुळे घाबरलेल्या मिरकुटे यांनी पोलीस स्टेशन, किनगावराजा येथे सविस्तर माहिती दिली़. त्यानंतर ठाणेदार सोमनाथ पवार यांनी पाेलिसांची दोन पथके रवाना केली. मिरकुटे यांनी सांगितलेली दुचाकी आणि आरोपीच्या वर्णनावरून तसेच गाेपनीय माहितीवरून पाेलिसांनी विजय राठाेड व अमाेल राठाेड यांना अटक केली़. यातील एकाला जालना येथून, तर एकाला पिंपरखेड बु.येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चाेरीला गेलेला ऐवज जप्त केला़. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साहेबराव बनसोडे, पोहेकॉ रमेश गोरे, पोकॉ. सलीम परसुवाले, गजानन सानप, जाकेर चौधरी हे करीत आहेत.