खामगाव : सोमवारपासून परतलेल्या पावसाने गेल्या ३0 तासांपासून संततधार कायम ठेवल्याने पूण्रेला पूर आला आहे. पुरामुळे संग्रामपूर, जळगाव जामोद व मलकापूर तालुक्यांतील गावांचा संपर्क तुटला असून, काही मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे. खिरोडा तसेच येरळी येथील पुलावरून बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत आठ फूट पाणी वाहत होते, तर संग्रामपूर तालुक्यातील भोन गावाला पुरामुळे वेढा पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जळगाव जामोद तालुक्यात २७0 मि.मी. झाला, त्यापाठोपाठ मलकापूर तालुक्यात १५५ मि.मी. आणि सर्वांत कमी देऊळगावराजा तालुक्यात ७६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बुलडाणा तालुक्यात १६५ मि.मी., चिखली ११८ मि.मी., मेहकर १0९ मि.मी., लोणार १0३ मि.मी., सिंदखेडराजा १४१ मि.मी., मोताळा १४0 मि.मी., नांदुरा ११९ मि.मी., खामगाव १३३ मि.मी., शेगाव १४५ मि.मी. व संग्रामपूर तालुक्यात १९९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सोमवार, ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार बुधवारी सकाळपर्यंत सुरूच होती. या ३0 तासांत जिल्ह्यात तब्बल १८४७.१ मि.मी. पाऊस झाला. त्याची सरासरी १४४.२ मि.मी. इतकी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची टक्केवारी ४४.२८ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३१५.६ मि.मी. पाऊस झाला. मागील दीड महिन्यांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीची वेळ आली होती; मात्र सोमवारपासून सर्वदूर सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. थोडाही खंड न पडता सुरू असलेला पाऊस तब्बल ३0 तास संततधार पडत होता. बुधवारी मात्र पावसाचा जोर कमी झाला, तर पावसाची रिपरिपही सुरूच होती.
प्रकल्पांतील जलाशयात वाढ
मंगळवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठय़ा प्रकल्पांमधील जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळांचे, तर ७४ लघु प्रकल्प आहेत. नळगंगा प्रकल्पात उपयुक्त साठा १५.३८ दलघमी आहे. याची टक्केवारी २२.१८ आहे. पलढग प्रकल्पाचा उपयुक्त साठा २.६८ दलघमी आहे. या प्रकल्पात उपयुक्त साठा ३५.६९ टक्के आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाचा उपयुक्त साठा १0.३१ दलघमी एवढा आहे. याची टक्केवारी ३0.३९ आहे. मस प्रकल्पाचा उपयुक्त साठा ५.४७ दलघमी आहे, तर टक्केवारी ३६.३९ टक्के आहे.