लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: कामगारांच्या संख्येसोबतच कामगार कल्याण केंद्राच्या जागेचाही प्रश्न ऐरणीवर आल्याने, शेगाव येथील प्रस्तावित कामगार कल्याण केंद्राला निर्मितीपूर्वीच ‘ग्रहण’ लागल्याचे दिसून येते. कामगार संख्या, जागा आणि इतर प्रशासकीय बाबींचा ‘तिढा’ सुटणार की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.कामगार कल्याण विभागाच्या अकोला विभागीय कार्यालयांतर्गत शेगाव येथे नवीन कामगार कल्याण केंद्राच्या स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यानुषंगाने सहा. कल्याण आयुक्त विभागीय कार्यालय अकोला यांनी यासंदर्भातील प्रस्ताव कल्याण आयुक्तांकडे दाखल केला आहे. मात्र, कामगारांच्या संख्येसोबतच कामगार कल्याण केंद्राच्या जागेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शेगावातील कामगार कल्याण केंद्राला निर्मितीपूर्वीच ‘ग्रहण’ लागल्याचे दिसून येते. धार्मिक स्थळाच्या जागेचा प्रस्ताव!शेगावातील प्रस्तावित कामगार कल्याण केंद्राच्या जागेसाठी गौलखेड रोडवर असलेल्या एका धार्मिक स्थळाची निश्चिती करून प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव कल्याण आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. धार्मिकस्थळी कामगार कल्याण केंद्राची निर्मिती नको, अशी ओरड करीत या प्रस्तावाला विरोध केल्या जात आहे. परिणामी, शेगावातील प्रस्तावित कामगार कल्याण केंद्रांचे ग्रहण सुटणार नसल्याचे संकेत आहेत.लोकप्रतिनिधी अनभिज्ञ!कामगार संख्येच्या अभावामुळे शेगाव येथील कामगार कल्याण केंद्राची निर्मिती रखडली आहे; मात्र यासाठी आता नव्याने प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, जागेचाही सर्व्हे करण्यात आला आहे. तथापि, या प्रस्तावापासून शेगाव येथील लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याची चर्चा आहे. शेगाव येथे कामगार कल्याण केंद्राच्या निर्मितीसाठी जागांचा सर्व्हे करून काही जागांची निश्चिती करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव कल्याण आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेला आहे. कामगारांची संख्या मोठी असल्यानेच कामगार कल्याण केंद्राची निर्मिती केली जात असून, शेगावातील कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रयत्न आहेत.-डॉ. रामेश्वर अळणे, सहा. कल्याण आयुक्त, विभागीय कार्यालय, अकोला.
शेगावातील प्रस्तावित कामगार कल्याण केंद्राला ‘ग्रहण’!
By admin | Updated: May 24, 2017 00:31 IST