किनगाव जट्टू येथून जवळच असलेल्या भुमराळा येथील शेतकरी लक्ष्मण टेकाळे हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्याकडे फक्त साडेतीन एकर जमीन आहे. पूर्णा नदीतून पाणी घेऊन शेती व्यवसाय करतात; परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्याची झाली आहे. शेती व येणाऱ्या मालाला कमी भाव, असे संकट एकामागोमाग एक सुरू आहे. त्यामुळे शेतीला लागलेला खर्च वसूल होत नाही. त्यांनी भाजीपाला लावणी करून विक्री सुरू केली होती. दरम्यान, कोरोना संसर्ग आजारामुळे बाजार बंद होते, त्यामुळे भाजीपालासुद्धा कमी भावात विकावा लागला. शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्याकरिता दोन गीर जातीच्या गाई विकत आणून त्यांच्या दुधापासून दही, तूप, पनीर, इतर पदार्थांचा विक्री व्यवसाय सुरू केला. त्यांना कोरोनाच्या काळात शेतीला जोडधंद्यातून प्रगतीचा मार्ग सापडला आहे. गाईच्या शेणापासून व गोमूत्रापासून सेंद्रिय खत तयार होत असल्याने शेतातील मालाला उपयोगी पडत असून, विषमुक्त पिकाचे उत्पादन तयार होत असल्याचे टेकाळे यांनी सांगितले.
गाईपालनातून साधली अल्पभूधारक शेतकऱ्याने प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:52 IST