शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा सूचना
शहर विकासासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही
सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्ह्याची सांस्कृतिक अेाळख असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजाचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन शहराचा पर्यटन, पुरातन वास्तूंच्या संवर्धनासह सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने १५ दिवसात यंत्रणांनी सर्वंकष आराखडा सादर करावा. या प्रश्नी आपण थेट केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची भेट घेऊन सिंदखेड राजा, लोणार, शेगाव असे टुरीझम सर्कल विकसित करण्यासाठी प्राधान्य देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंदखेड राजा येथे मांडली.
मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या विकास आराखड्यासंदर्भात नुसतीच चर्चा होत आहे. मात्र, जमीनस्तरावर त्यादृष्टीने भरीव काम होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी सिंदखेड राजा येथे भेट देऊन पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिंदखेड राजा शहर परिसराच्या सर्वांगिण विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात ही आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे होते. बैठकीला नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या सीईअेा भाग्यश्री विसपुते, राजे जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव, नगराध्यक्ष सतीश तायडे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती पूनम राठोड, तहसीलदार सुनील सावंत, पंचायत समिती सभापती मीना बंगाळे, राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकारी जया वाहणे, केंद्रीय पुरातत्व विभागाचे संवर्धक मिलिंद अंगाईतर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
सुळे पुढे म्हणाल्या की, सिंदखेड राजा, लोणार व शेगाव या तीनही महत्त्वपूर्ण शहरांना पर्यटनासह विकासाच्या त्रिकोणात जोडण्याच्या दृष्टीने योजना आखली जावी. सोबतच सिंदखेड राजातील पायाभूत सुविधांवर स्थानिक प्रशासनाने काम करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावेत, सिंदखेड राजाच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासमवेत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन विकास आराखड्यास अधिक गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. सोबतच आभा लांबासारख्या अभ्यासू व्यक्तींना यासंदर्भाने भेटण्याच्या सूचना करत येत्या १५ दिवसांत केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना भेटून येथील विकासाचे मुद्दे रेटणार असल्याचे त्या म्हणाल्या.
--जिजाऊ दशरात्रोत्सव वेरूळच्या धर्तीवर व्हावा--
या आढावा बैठकीत सिंदखेड राजात साजरा केला जाणारा जिजाऊ दशरात्रोत्सव वेरूळ महोत्सवाच्या धर्तीवर साजरा केला जावा असे स्पष्ट करत या महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रमुख संदेश देता येईल, यासाठी प्रयत्न व्हावेत. सोबतच १२ जानेवारीच्या जिजाऊ जयंती दिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथे माँ जिजाऊंची महापूजा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी हा मुद्दाही संसदेत आपण मांडू असे त्या म्हणाल्या.
--मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार आढावा : शिंगणे--
सिंदखेड राजा विकास आराखड्यासह शहाराच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही येथील कामांची पाहणी करणार आहेत. सोबतच संपूर्ण विकासकामांचा ते आढावा घेणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.