साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : साखरखेर्डा ते मेहकर या मेन लाइनवरील विद्युत पोल पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामस्वरुप गेल्या ३६ तासापासून साखरखेर्डासह परिसरातील २५ गावे अंधारात आहेत. विज पुरवठा खंडीत असल्याने विज पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याबाबत विज पुरवठाचे कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याने विज ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.साखरखेर्डा येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या उपकेंद्रात मेनलाईनद्वारे मेहकर येथून विज पुरवठा होतो. मेहकर ते साखरखेर्डा स्पेशल एक्सप्रेस फिडर नसल्याने या लाईनवर नेहमीच विज पुरवठा खंडीत होतो. मेहकर येथून हिवराआश्रम, देऊळगाव माळी, पेनटाकळी आणि साखरखेर्डा या चार ठिकाणच्या ३३ के.व्ही.उपकेंद्रावर विज पुरवठा होतो. मेहकर येथून सर्व केंद्रासाठी एकच लाईन असल्याने कोणत्याही क्षणी विज पुरवठा खंडीत होवू शकतो. १५ जून ते ११ जुलै पर्यंंंत सतत ८ ते ९ वेळा मेन लाईनवर बिघाड झाल्याने तब्बल २४-२४ तास विजपुरवठा खंडीत राहतो. ११ जुलै रोजी दुपारी २ वाजता गुंज ते वरोडी मध्ये एक पोल पावसाने पडला. साखरखेर्डासह सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, गुंज, वरोडी, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, काटेपांग्री, बाळसमुद्र, दरेगाव, तांदूळवाडी ही गावे ३६ तासापासून अंधारात आहेत. स्थानिक कनिष्ठ अभियंता अतुल शेडगे यांचेशी दोन दिवसांपासून ग्राहकांनी संपर्क केला असता ते कोठेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विज पुरवठा केंव्हा सुरळीत होईल, याचे प्रत्यक्ष उत्तर एकही कर्मचारी देत नाही. गेल्या ३६ तासापासून विज पुरवठा खंडीत आहे. या मुळे पिठाच्या गिरण्या, नळयोजना, प्रभावीत झाल्या आहेत.
खांब पडल्याने ३६ तासांपासून २५ गावांमधील वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: July 13, 2016 02:09 IST