अंढेरा (जि. बुलडाणा) : देऊळगावराजा तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे अंढेरा येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून, येथून अंढेरा, इसरुळ, मंगरुळ, शेळगाव आटोळ, या चार गावांना वीजपुरवठा होतो; मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून अंढेरा गावासह तीन गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित असतो. शिवाय वीज ग्राहकांना जादा वीज देयकही देण्यात येते. वीज कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. गावाला ३३ केव्ही उपकेंद्राच्या एकच गावठाण फिडरवरुन विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे वीजदाब कमी होऊन गावठाण व झोपडपट्टी परिसरात अगदी कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे घरातील लाईट व इतर वीज उपकरण काम करीत नाहीत किंवा बर्याच वेळा बंद पडतात. गावांत दर महिन्याला विद्युत देयक येत असून, वीज ग्राहकांना जादा बिल देण्यात येते. याबाबत ग्रामस्थांनी बर्याचवेळा ३३ केव्ही उपकेंद्र अंढेरा यांच्याकडे तक्रारी केल्या; मात्र येथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांना पिटाळून लावतात. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.
वीज कंपनीचा मनमानी कारभार
By admin | Updated: July 14, 2015 02:09 IST