बुलडाणा : मलकापूर उपविभागात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या आनुषंगाने १८ जानेवारी २०२१ पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये या दृष्टिकोनातून कलम १४४ उपविभागात लागू करण्यात आले आहे. त्यानुसार मलकापूर उपविभागात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांना प्रचाराच्या वेळी त्यांचे वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. तसेच निवडणुकीचे प्रचारासाठी वापरायचे वाहनांची परवानगी संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे.
प्रचार कार्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. तसेच उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून २०० मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या १०० मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे. उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना आगाऊ कळवावे लागणार आहे.