दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील रहेरी ते राहेरी, शेवली, किनगाव राजा, हिवरखेड, मेहुणा राजापर्यंत तढेगाव फाटा ते देऊळगाव महीपर्यंत, दुसरबीड ते केशव शिवनी रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेकजण जखमी आले आहेत. खड्ड्यांमुळे महामार्गावर एस. टी. बस उलटली हाेती. बसचालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव वाचला होता. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होत आहेत. परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र, याकडे संबंधित विभागातील वरिष्ठांचे दुर्लक्ष हाेत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.